जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला
नवी दिल्ली : येत्या 1 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक वाहने घेणे आणखी सोपे होणार आहे. कारण यावर असणाऱ्या जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीत 12 टक्क्यांवरून चक्क 5 टक्क्यांवर कर आणला आहे. नुकत्याच झालेल्या जीएसटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून नवे टॅक्स येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी कर आणि कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सांगितले होते. त्यानुसार आता सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांवरील 12 टक्के जीएसटी हा 5 टक्क्यांवर आणला आहे. तसेच यामध्ये सौरऊर्जा निर्माण करणारे साहित्य आणि सेवेचे मुल्य तसेच वाईंड टर्बाइन प्रकल्पातील कर सवलतीविषयीदेखील चर्चा करण्यात आली. दरम्यान,इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी झाल्याने या उद्योगाला बळ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.