नेवासा -सर्वच शिक्षक मुख्यालयी रहात नाहीत आणि तुम्ही सुद्धा कुठे मुख्यालयी राहता मग आमचीच चौकशी कशी करता ? असा थेट सवाल मुख्यालयी रहात नसलेल्या शिक्षकांनीच नेवासा गट शिक्षण अधिकाऱ्यांनाच उपस्थित केल्यामुळे चौकशीसाठी आलेल्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धवट चौकशी करून परतावे लागल्याची घटना कांगोणी (ता.नेवासा) येथे घडली.
याची माहिती तक्रारदार सोपान रावडे यांनी जिल्हा शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे दिली. त्यामुळे आता जिल्हा शिक्षण विभाग नेमकी कोणाची चौकशी करणार ? असा संभ्रमावस्थेचा प्रश्न कांगोणी येथील चौकशी नाट्यातून समोर आलेला आहे.
कांगोणी (ता.नेवासा) येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी नेवासा तालुक्यातील ज्ञानार्जन करणारी काही गुरुजण मंडळी नेमणुकीच्या ठिकाणी मुख्यालयी रहात नसतांना उलटपक्षी राज्य शासनाकडून घरभाडे वसूल करून काही शिक्षक शासनाच्या निधीवर गैरमार्गाने डल्ला मारत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षक शाळेत वेळेवर येत नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार रावडे यांनी शिक्षण विभागाकडे केली होती.
त्यामुळे शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी राहतात की नाही, याचा अहवाल देण्यासाठी व चौकशी करण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाने नेवासा गटशिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. कांगोणी येथे चौकशीसाठी गेलेल्या गट शिक्षणाधिकाऱ्यांवरच मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे नेमका जिल्हा शिक्षण विभाग आता कोणाची चौकशी करणार आणि कोणावर कारवाई करणार की, कागदोपत्री भूत नाचवून सत्यता डावलणार, असा सवालही रावडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यालयाचा प्रश्न अधांतरीच आहे.
चौकशीकामी मी कांगोणी येथे गेले होते. त्यावेळी तेथील शिक्षक मला असे काहीही बोलले नाहीत. आम्ही मुख्यालयी रहातो याचा पुरावा सादर करू, असे त्यांनी मला सांगितले.
सुलोचना पटारे, गटशिक्षणाधिकारी, नेवासा