हरित लवादाचा भाजपाला धक्का

मोशीतील सांडपाणी प्रकल्प जमीनदोस्त करण्याचे आदेश


इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील सांडपाणी प्रकल्प


राष्ट्रीय हरित लवादाचा महापालिकेला आदेश


5 टक्के काम पूर्ण; पालिकेचे सहा कोटी पाण्यात जाणार


फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने केलेल्या तक्रारीची दखल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे इंद्रायणी नदी पात्रालगत उभारण्यात येणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बेकायदेशीर असून इंद्रायणी नदी पात्रालगत निळ्या पूररेषेत हा प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे महिनाभरात हा प्रकल्प जमीनदोस्त करावा, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गुरुवारी (दि. 30) महापालिकेला दिला. कारवाई करून अहवाल सादर करण्याचेही निर्देशही दिले आहेत. दरम्यान, भाजपने आर्थिक लाभासाठी चुकीच्या पद्धतीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लवादाने चपराक दिल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक दत्ता साने यांनी दिली आहे. दरम्यान या आदेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पर्यावरणाची हानी होऊ नये व नदीचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात जून 2019 मध्ये फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. हा प्रकल्प अनधिकृतपणे इंद्रायणी नदी पात्रालगत निळ्या पूररेषेत महापालिका उभारला जात आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिकेने काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली होती. आतापर्यंत साधारण 5 टक्के काम झाले असून, यावर सुमारे 6 कोटी रूपये खर्च झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नोटीस बजाविल्यानंतरही काम सुरूच राहिल्याने रिव्हर रेसिडेन्सीने हरित लवादाकडे न्याय मागितला होता. त्यावर सुनावणी होऊन लवादाने 22 जून रोजी सविस्तर अहवाल मागविला. त्यानुसार 6 जुलैला स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर अंतिमत: प्रकल्पाला स्थगिती दिली होती. प्रकल्पाचे पाया भरणी व सीमाभिंत बांधणीचे काम पूर्ण झाले होते. यावर हरित लवादात सुनावणी झाली. दोघांची बाजू ऐकूण घेत हरित लवादाने हा प्रकल्प जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसेच बांधकाम पाडल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

नागरिकांना न्याय मिळाला- साने
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक दत्ता साने म्हणाले, भाजपने आर्थिक लाभासाठी निळ्या पूररेषेत येत असतानाही चुकीच्या पद्धतीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्यात पाण्याचा पूर आला होता. त्यात हा प्रकल्प पूर्णपणे पाण्याखाली गेला. तो देखील सत्ताधारी आणि प्रशासनाला दाखविला. तरी, सुद्धा काम केले जात होते. रिव्हर रेसिडेन्सीचा त्याला विरोध होता. परंतु, सत्ताधारी आणि प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांना दुर्लक्षित करून काम रेटण्याचा प्रयत्न केला. याबाबत अनेकवेळा मी सभागृहात आवाज उठविला. रिव्हर रेसिडन्सीमधील नागरिकांचे मत सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकहाती सत्ता असलेल्या भाजपने दमदाटी करुन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हरित लवादाने त्यांना मोठी चपराक दिली आहे. लवादाने जनतेला आणि आम्हाला न्याय दिला.

आदेशाचे पालन होईल- निकम
हरित लवादाने चिखली येथील प्रकल्प हटविण्याचा आदेश दिल्यानंतर याबाबत बोलताना सहशहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, चिखलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निळ्या पूररेषेत येत असल्याने हरित लवादाने पाडण्याचे आदेश दिले आहेत. प्रकल्पाचे काम केवळ पाच टक्के झाले होते. लवादाच्या आदेशानुसार हे बांधकाम पाडण्यात येईल. यापुढे तिथे कोणतेही काम केले जाणार नाही. तसेच आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.