पुणे मेट्रोसाठी 4800 कोटींची इन्व्हेस्टमेंट

1600 कोटींच्या पहिला हप्त्याचा सामंजस्य करार

मुंबई – पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी यासाठी युरोपियन बॅंक आर्थिक मदत करणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक सुमारे 4 हजार 800 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा करणार आहे. त्याचा 1 हजार 600 कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याबाबतचा सामंजस्य करार आज पुणे मेट्रो पुणे मेट्रो आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व बॅंकेचे उपाध्यक्ष अँर्ड्यू मॅकडोवेल यांनी करारावर स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बॅंकेने केलेल्या या सहकार्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळणार असून पुणे मेट्रो लवकर कार्यान्वित होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे पुणे व आसपासच्या परिसरातील वाहतुकीत प्रभावीपणे सुधारणा होईल व पुण्याच्या विकासास हातभार लागेल. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या सहकार्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळणार असून भविष्यात इतरही प्रकल्पांना युरोपियन बॅंकेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे मेट्रोची भौतिक प्रगती सध्या 37 टक्के तर आर्थिक प्रगती 29. 53 टक्के झाली आहे. बॅंकेने दिलेल्या निधीचा वापर मेट्रोच्या भुयारी मार्ग, डेपो कामांसह इतर कामांसाठी केला जाईल. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंकेची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणूक विकास आशादायक आहे. पुणे मेट्रोबरोबरच नाशिक मेट्रोसाठी व पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार
महाराष्ट्र सरकारने पुणे, मुंबई मेट्रो बरोबरच राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईत 80 टक्के नागरिक हे सार्वजनिक वाहतुकीचा विशेषत: लोकलचा वापर करतात. त्यामुळे मेट्रो सारखे प्रकल्प सुरू केले असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या मेट्रो प्रकल्पामुळे पुणे, मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.