युवा स्पंदनच्या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद, सफाईकामगारांनीदेखील केलं महादान
पुणे- “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संकल्पनेतून औंधमधील युवा स्पंदन संस्थेतर्फे रविवारी(दि.२०) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. औंधमधील सरस्वती मंगल कार्यालयात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. संपन्न झालेल्या शिबिरात सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत सफाईकामगार, सुरक्षारक्षकांनी देखील रक्तदान केले. त्यासोबतच १०३जणांनी रक्तदान करून मोलाचं योगदान दिलं.
युवा स्पंदन संस्थेचे संस्थापक आणि मनसे चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष चेतन धोत्रे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी करण सुरवसे, शंतनू कुलकर्णी, निकिता जाधव, सिद्धार्थ चौधरी, केतन कांबळे, प्रवीण चव्हाण, गौरी दर्डा ,विनीत पाटील, तिशा खोल्लम, काजल फाकटकर, अभिषेक कदम, प्रशांत पाटील व संख्येचे इतर तरुण सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे सदस्य अक्षय लांडगे यांनी केले.
सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी रांगा लावल्या होत्या. रक्तदान करण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. परंतु रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे बहुतांश महिलांना रक्तदान करता आले नाही. तसेच प्रचंड गर्दीमुळे अनेकजण रक्तदान करण्यासाठी प्रतीक्षा (वेटींग) करावी लागली. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले.
अनलॉकनंतर रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. परंतु करोनामुळे रक्तसाठा कमी झाला आहे. याचा परिणाम शस्त्रक्रियांवर होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाच्या आवाहनानुसार व तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवून त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यासाठी प्रतिष्ठाणच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती यांच्यासह महिलाभगिनींनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वांनी सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून रक्तदान करत सहकार्य केले. तसेच हे रक्तदान शिबीर सफल करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलेले मोलाचं कार्य सार्थकी लागलं, असे संस्थापक चेतन धोत्रे यांनी सांगितले.
दरम्यान, युवा स्पंदन ही संस्था गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करत आहे. त्यात रक्तदान शिबीर, पोलिस फ्रेन्डशिप डे, लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांसाठी निधी गोळा यांसारख्या अनेक सामाजिक उपक्रांमध्ये या संस्थेचा विशेष सहभाग असतो.