मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भडकण्यात सहभाग असणे आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपात गुन्हा दाखल असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रमक आंदोलन झाले तेंव्हापासून सदावर्ते दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
सदावर्तेंच्या घराच्या छतावर जी मिटिंग झाली त्या मिटिंगला जयश्री पाटील उपस्थित होत्या, तसेच एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेण्यातही त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे त्यांना सहआरोपी करावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात जयश्री पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जयश्री पाटील काही काळ फरार असल्याच्याही चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी अटपूर्व जामीनासाठी थेट कोर्टात धाव घेतली. याच प्रकरणात आता कोर्टाने त्यांना तुर्तास दिलासा दिला आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी
दरम्यान, आक्षपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (सोमवारी) त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारी पक्षाने केलेली पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावण्यात आली.