बिजिंग – तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देऊन अमेरिका चूक करत आहे. त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, अशी धमकी चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांनी दिली. त्यामुळे या दोन महासत्तांमधील तणावात भर पडली आहे.
तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेले काही महिने तणावाचे आहेत. तैवान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणत असताना चीनने मात्र सातत्याने तैवानवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी दावे केले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तैवानच्या बाजूने आपली ताकद उभी करण्याचे जाहीर केले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांनी सरकारी जिन्हुआ वृत्तवाहिनीला सांगितले की, तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देऊन अमेरिकेनं तैवानला एका भयंकर परिस्थितीमध्ये आणून सोडले आहे. पण त्यासोबतच, अमेरिकेला यासाठी न झेपणारी किंमत चुकवावी लागेल, अशा इशाराच वॅंग यी यांनी दिला आहे. चीनमध्ये पुन्हा विलीन होण्याशिवाय तैवानकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही, असे वॅंग यी म्हणाले आहेत.
तैवानमध्ये सध्या लोकशाही शासन व्यवस्था आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून चीन तैवान हा आपलाच भाग असल्याचा दावा करत आहे. यासाठी चीनकडून आक्रमकपणे लष्करी आणि धोरणात्मक हालचाली केल्या जात आहेत.