वॉशिंग्टन – करोना विषाणूच्या प्रादुर्भावापूर्वीपासून अडचणीत सापडलेल्या जागतिक अर्थकारणाला आता 2020 मध्ये मोठ्या आर्थिक मंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षा क्रिस्तलिना जॉर्जिवा यांनी दिला आहे. अनेक उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना सध्याच्या आपत्तीमुळे मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या वसंतकालीन वार्षिक सभेच्या वेळी विकास समितीच्या बैठकीस संबोधित करताना त्या बोलत होत्या. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एक मोठा जागतिक मंदी अपरिहार्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
आपापसातील वाद, धोरणांबाबतची अनिश्चितता आणि भूराजकीय तणावांमुळे अगोदरच कमकुवत झालेल्या जागतिक अर्थकारणाला करोनाच्या साथीमुळ मोठा फटका बसला आहे. मध्यमकालीन अंदाजांवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. त्याच प्रमाणे करोनाच्या साथीवरील उपाय योजनांमुळे प्रवास बंदी आणि सोशल डिस्टन्सिंगयासारख्या दीर्घकालीन परिणामही सोसायला लागणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.
जागतिक मूल्य शृंखलेतील अडचणी, खालावलेली थेट परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण, भांडवली उत्प्रवाह, बिकट आर्थिक परिस्थिती, पर्यटन आणि निधी हस्तांतरणात झालेली घट तसेच आयात करायला लागणाऱ्या अन्नपदार्थ आणि औषधांच्या किमतींवरील ताण यामुळे विकसनशील अर्थव्यवस्थांना आगोदरच बिकट स्थितीला तोंड द्यावे लागत होते. जगभरातील 143 देशातील 368.5 दशलक्ष मुलांपुढे कुपोषणाची समस्या आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भडकल्यामुळे सर्वसामान्य जीवनमानासाठी मोजावी लागणारी किंमतही मोठी असणार आहे, असेही त्या म्हणाल्या.