अहमदाबाद – भारताचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी शनिवारी (6 मार्च) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला शनिवारी पन्नास वर्षे पूर्ण झाली. या महत्त्वाच्या घटनेचे औचित्य साधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांचा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सन्मानचिन्ह देत सत्कार केला.
तिसऱ्या दिवसाच्या लंचदरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा यांनी गावसकर यांना स्मृतिचिन्ह भेट देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. स्मृतिचिन्ह म्हणून दिलेल्या एका खास टोपीवर पुढील भागी ‘Celebratiing 50 Years’ तर एका बाजूस गावसकर यांचा “टेस्ट कॅप नंबर’ असलेला 128 हा क्रमांक तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या पदार्पणाची 6 मार्च 1971 ही तारीख कोरली आहे.
यावेळी स्टॅंडमध्ये मोठे पोस्टर झळकावण्यात आले. ज्यावर लिहिले होते की गावसकर कसोटीमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज. तसेच त्यावर त्यांनी 10 हजार धावा केल्या ती 7 मार्च 1987 ही तारीख लिहिली होती. विशेष म्हणजे हा विक्रम गावसकरांनी अहमदाबामध्ये खेळतानाच केला होता.
दरम्यान, सुनील गावसकर यांनी आजच्या दिवशी म्हणजेच 6 मार्च 1971 साली वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
पहिल्याच मालिकेत वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना त्यांनी चार सामन्यात चार शतकांच्या सहाय्याने 774 धावा काढल्या. गावसकर यांनी आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10,022 धावा आपल्या नावे केल्या होत्या.