नेवासा – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान खंडोबारायाची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथे श्री खंडोबा म्हाळसादेवी, नारदमुनी, सच्चिदानंद बाबा यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराचा चौथा वर्धापनदिन व चंपाषष्ठीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व चंपाषष्ठी उत्सवाला”येळकोट येळकोट जय मल्हार” चा जयघोष करत धर्मध्वज पूजनाने सोमवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.११ ते ते १८ डिसेंबर या कालावधीत सोहळा साजरा होत आहे. या सोहळयाचा शुभारंभ पारायण व्यासपीठ चालक हभप विजय महाराज पवार यांच्या हस्ते धर्मध्वजपूजनाने करण्यात आला.
यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज पेचे, देवस्थानचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर कराळे, विश्वस्त प्रभाकर बोरकर, गणपत नळकांडे, सर्जेराव चव्हाण, संजय मारकळी, अशोक मारकळी, रविंद्र मारकळी, रमेश काशीद, एकनाथ डोहोळे, सुभाष जपे, एकनाथ रेडे, अशोक काळे, रावसाहेब पेचे ,पुंजाराम पेचे, रंजनाताई भाकरे यांच्यासह भाविक उपस्थित होते. श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज हे सोमवारी दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भेट देणार आहे. दि.१८ डिसेंबर रोजी सोहळयाचे मार्गदर्शक हभप उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळयाची सांगता होणार आहे.