नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून उठलेल्या वादावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर, सामनाचे संपादक आणि एक कलाकार असल्याने त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्यास राज्यपालांना कोणतीही अडचण नाही. त्यांना निर्णय घ्यावाच लागेल, असे छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र, राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिवाय भाजपनेही मंत्रिमंडळ निर्णयाला आक्षेप घेत, उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांकडे बोट दाखवत राज्यपाल निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे. छगन भुजबळांनीही राज्यपालांना निर्णय घ्यावा लागेल, अस म्हणत आपली बाजू मांडली.
राज्यपाल अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करू शकत नाहीत. उद्धव ठाकरे हे व्यंगचित्रकार, फोटोग्राफर, संपादक आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सगळ्या नियमात उद्धव ठाकरे बसत आहेत. करोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे छगन भुजबळ म्हणाले.