दूधासाठी लोणीत आंदोलन
बाळासाहेब सोनवणे
राहाता – महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही. मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच आता केवळ बैठकांचा फार्स करू नका. दूधउत्पादकांच्या मागण्या मान्य करा. अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येवून धडकेल, असा इशारा त्यांनी दिला.
दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करून सरकारमधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. नगर-मनमाड रस्त्यावर घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले. दूध उत्पादकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन आ. विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. या आंदोलनात गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुंकुंदराव सदाफळ, तालुका दूध संघाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख, अध्यक्ष नंदू राठी, सभापती बापूसाहेब आहेर, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, ज्येष्ठ नेते शरद थोरात, ऍड. रघुनाथ बोठे, भाजपचे शहराध्यक्ष अनिल बोठे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, दीपक रोहोम, वाल्मीकराव गोर्डे, बाबासाहेब डांगे, डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. मुख्यमंत्री मुलाखतीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची थट्टा करीत आहेत. करोना संकटात शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकार करू शकले नाही. राज्यात युरिया खताचा काळा बाजार राजरोसपणे सुरू आहे. सोयाबीन बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली. पण एकाही खासगी कंपनीवर सरकारने गुन्हे दाखल केले नाहीत. दुबार पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नसल्याची टीकाही आ. विखे पाटील यांनी केली.
मागील युती सरकारने समिती नेमून अनुदानाचा निर्णय केला. निर्णय प्रक्रियेत असलेले आज राज्यात मंत्री आहेत. मग आता शेतकरी विरोधी भूमिका का. 10 रुपये तोटा सहन करून शेतकरी दूध धंदा करीत आहेत. शेतकऱ्यांना आघाडी सरकारने 25 रुपये हमीभाव जाहीर केला. पण राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघानी शेतकऱ्यांचे दूध 18 ते 19 रुपयांनी खरेदी करून दूध उत्पादकांची फसवणूक केली आहे. सरकार दूध भुकटीसाठी अनुदान देत असतानाही शेतक-यांना मिळत नाही मग या अनुदानाचे गौडबंगाल काय आहे. दूध अनुदानाचा या महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तुम्ही जनतेच्या मनातून पडला आहात ः आ. विखे
मुख्यमंत्री रोज विरोधकांना म्हणतात सरकार पाडून दाखवा. पण सरकार पाडण्यात आम्हाला रस राहिलेला नाही. तुम्ही तर जनतेच्या मनातून केव्हाच पडले आहात, असा टोलाही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
विखे, शिंदे यांच्यासह आंदोलकांवर गुन्हे
दूध दरवाढीसाठी आज राहाता येथे वीरभद्र डेअरीसमोर माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केले. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य 30 व्यक्तींवर राहाता पोलिसांत पोलीस नाईक दीपक कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.