पिंपरी – शिवसेनेचे शहर संघटक तथा पिंपरी-चिंचवड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमित बाबासाहेब धुमाळ यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री उशीरा निधन झाले. मृत्यूसमयी ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कै. बाबासाहेब धुमाळ यांचे अमित धुमाळ हे चिरंजीव होत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना किडणी आणि हृदयाशी संबंधित आजार असल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सातत्याने प्रकृती ढासळत गेल्याने काल रात्री त्यांच्यी प्राणज्योत मालवली. बाबासाहेब धुमाळ यांच्या निधनानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड ट्रान्स्पोर्ट असोसिएशनची धुरा सांभाळली होती. तसेच ते व्यवसायिक क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी शोक व्यक्त केला आहे.