RTI मध्ये धक्कादायक माहिती उघड; PM Kisan योजनेत 20 लाख ‘बोगस’ लाभार्थ्यांच्या खात्यावर 1364 कोटी रुपये जमा

नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20.48 लाख बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,364 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने एका माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने 2019मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या अंतर्गत दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात.

हे पैसे कोणत्या अयोग्य किंवा बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत या संबंधी एक माहितीच्या अधिकाराचा अर्ज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करण्यात आला होता. कॉमनवेल्थ ह्यूमन राइट्‌स इनिशिएटिव्ह या संस्थेशी संबंधीत असलेल्या वेंकटेश नायक यांनी ही माहिती केंद्र सरकाकडे मागितली होती.

या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितले की अशा अयोग्य किंवा बोगस लाभार्थ्यांची दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. एक श्रेणी म्हणजे योजनेच्या अटी पूर्ण न करणारे शेतकरी आणि दुसरी म्हणजे आयकर भरणारे शेतकरी आहेत. या दुसऱ्या श्रेणीतील शेतकऱ्यांची संख्या ही 55.58 टक्के इतकी आहे.

त्या व्यतिरिक्त 44.41 टक्के असे शेतकरी आहेत की जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असलेले नियम आणि अटी पूर्ण करत नाहीत. तसेच अशा बोगस लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या रक्कमेची वसूली केंद्र सरकारने सुरु केली आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

पंजाबमध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी
पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यात बोगस लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती या माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी असून त्यांची संख्या देशातील एकूण बोगस लाभार्थ्यांपैकी 23.6 टक्के म्हणजे 4.74 लाख इतकी आहे.

त्यानंतर 16.8 टक्के म्हणजे 3.45 बोगस लाभार्थी हे आसाम राज्यातील आहेत. यामध्ये 13.99 टक्के लाभार्थी म्हणजे 2.86 लाख बोगस लाभार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. या तीन राज्यांतील बोगस लाभार्थ्यांची संख्या ही एकूण संख्येच्या 54.03 टक्के इतकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.