पुणे –पूरग्रस्तांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, बॅंक पासबुक आदी महत्त्वाचे दस्तावेज पुरामध्ये वाहून गेले आहेत अथवा भिजले आहेत, हे शासकीय दस्तावेज पूरग्रस्तांना पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तहसिलदार कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रांमार्फत हे दाखले नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात आलेल्या पुरामध्ये अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. नद्यांचे पाणी घरामध्ये शिरल्याने घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या तर काही वस्तू भिजून नष्ट झाल्या आहेत. यामध्ये महत्त्वाचे असलेले शासकीय दस्तावेज नष्ट झाले. आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंक पासबुक, रेशनकार्ड, मार्कलिस्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे दाखले असे दस्तावेज नागरिकांना नव्याने दिले जाणार आहे.