पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेच्या “ग’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेच्या वेळी शिवसेनेकडून “गोट्या खेळो’ आंदोलन करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांनी हे आंदोलन केले. तुमच्या काय समस्या आहेत, त्या मांडाव्या. त्यांचे निराकरण करण्यात येईल, असे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले परंतु शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित जनसंवाद सभांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, निवडणुकीसाठी इच्छुक आणि राजकीय मंडळींकडून सातत्याने काही ना काही वेगळे प्रकार करुन आपण जनतेच्या समस्यांबाबत किती जागरुक आहोत, हे दाखविण्याचे प्रयत्न होत आहेत. निवडणूक जशी जवळ येत आहे तसे हे प्रकार वाढत असल्याने अधिकारी आणि कर्मचारी देखील वैतागले आहेत.
जनसंवाद सभेत गोट्या टाकून हे आंदोलन करण्यात आले. “ग’ क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत 20 नागरिकांनी तक्रारी मांडल्या. मुख्य समन्वय अधिकारी तथा उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, क्षेत्रीय अधिकारी विनोद जळप, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, बाबासाहेब गलबले आदी या सभेला उपस्थित होते. पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे. अतिक्रमण काढण्यात यावे. प्रभागामध्ये साफसफाई करण्यात यावी, अशा विविध तक्रारी नागरिकांनी केल्या.
नागरिकांची कामे होत नसल्याने शिवसेनेच्या वतीने या प्रसंगी “गोट्या खेळो’ आंदोलन करण्यात आले. त्यांनी कार्यालयात गोट्या आणून टाकल्या. याविषयी ऍड. भोसले म्हणाले, स्थापत्य, पाणीपुरवठा, ड्रेनेजची कामे प्रलंबित आहे. उद्यानांची दुरावस्था झाली आहे. घंटागाडी वेळेवर येत नाही. या नागरिकांच्या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.
इंदलकर म्हणाले, कोणती कामे झालेली नाही, हे सांगावे, अशी विचारणा संबंधित माजी नगरसेवकांना करण्यात आली. आम्ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीच काम करीत आहोत. त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली आहे. तसेच, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत.