आश्रयदाताही जेरबंद : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
मंचर/पुणे – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधील भरूच जिल्ह्यातून अटक केली. त्याला आश्रय देणारा नवनाथ सूर्यवंशी याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. दोघांचा गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीशी थेट संबंध आहे. त्यांची मुसेवाला खून प्रकरणात काय भूमिका आहे, ते टोळीशी कसे संपर्कात आले याचा तपास केला जाणार आहे. त्याशिवाय अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीची माहिती संबंधितांना होती, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत कुमार सरंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मीतेश घट्टे, सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, एपीआय नेताजी गंधारे उपस्थित होते. यापूर्वी अटक केलेला साथीदार सौरभ ऊर्फ सिद्धेश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे याच्याकडून पोलीस कोठडीत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, त्याला रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. 29 मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती. संबंधित खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी आठ संशयित हल्लेखोरांबद्दल माहिती काढून तपासाला गती दिली. त्यामध्ये मंचरमधील सराईत संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश असल्याची शक्यता आहे. पूर्ववैमनस्यातून सराईत संतोष जाधव याने साथिदारांसह मिळून ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना ऑगस्ट 2021 मध्ये घडली होती. त्यानंतर तो फरार होता. मुसेवाला प्रकरणातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांची पथके गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब येथे रवाना केली. ही पथके मागील सात ते आठ दिवसांपासून आरोपींचा शोध घेत होती.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या पथकाने केली. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या महांकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडे दिल्ली, पंजाब पोलिसांनी पुण्यात येऊन चौकशी केली. महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाब पोलिसांच्या समन्वयातून हा तपास सध्या सुरू आहे.
सोशल मीडियामार्फत होते संपर्कात
लॉरेन्स बिष्णोई गॅंगचे सदस्य भारतभर पसरले असून, यामधे आणखी संशयित निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या बिष्णोई टोळीसाठी काम करण्यासाठी आणखी काही जण बिष्णोई टोळीच्या संपर्कात असून, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. त्याना बिष्णोई गॅंगमध्ये नेण्याचे काम जाधवने केले असण्याची दाट शक्यता आहे. सोशल मीडियाद्वारे आरोपी ऍक्टिव्ह होते. त्यातून फेसबुक कॉल, व्हॉट्सऍप कॉल, इन्स्ट्राग्राम कॉलच्या माध्यमातून त्यांचा संपर्क सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महांकाळ याने इन्स्ट्राग्राम कॉलचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.
संतोष जाधवचे वेशांतर
राजस्थानात बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्यानंतर जाधवने छोटी दाढी राखली. बिष्णोई टोळीतील सराईतांप्रमाणे त्याने पेहराव केला. मुसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर जाधवने केस कापले. माळ काढून टाकली तसेच गंध लावणे बंद केले. जाधवचा साथीदार नवनाथ सूर्यवंशी मूळचा सातारा जिल्ह्यातील खटावचा आहे. त्याने संतोषला आश्रय दिला होता. त्याने संतोषला स्वत:चे सिमकार्ड वापरास दिले होते. विविध ठिकाणी ते राहत होते.