पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील 263 प्राथमिक शाळांना 88 हजार 596 पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना बुधवारपासून (दि. 15) देण्यात येणार आहे.
समग्र शिक्षा अभियानातंर्गत महापालिकेच्या 128 आणि 135 खासगी अनुदानित प्राथमिक शाळांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. अशा एकूण 263 शाळांना ही पाठ्यपुस्तके दिली जातात. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकूण 88 हजार 596 पाठ्यपुस्तके यंदा दिली जाणार आहेत.
शहरातील काही खासगी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. तथापि, महापालिकेच्या शाळा व अन्य काही खासगी शाळा बुधवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना नियमित वाटप बुधवारपासून सुरू होणार आहे. यंदा बालभारतीकडून विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक सर्व पुस्तके मिळालेली नाही. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेली पुस्तकेही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
महापालिका व खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा चारही माध्यमांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्तानिहाय शाळांना दिलेली पुस्तके
पहिली 5026, दुसरी 7697, तिसरी 8683, चौथी 11532, पाचवी 12946, सहावी 13633, सातवी 14604, आठवी 14475 : एकूण 88596