मुंबई : देशाबाहेर पर्यटनासह अन्य कामांनिमित्त जाणाऱ्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कारण आजपर्यंत करोना प्रतिबंधित लसीच्या दोन मात्रांमधील अंतर हे विशिष्ट दिवस होते मात्र आता करोनाच्या लसीची दुसरी मात्रा ८४ ऐवजी २८ दिवसांनी घेता येणार आहे. त्यासोबतच शासकीय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
मुंबई महापालिकेने लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने जारी केल्या आहेत. पर्यटनासह अन्य कारणांसाठी परदेशात जाणारे नागरिक आणि शासकीय, खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना आता कोव्हिशिल्ड या करोना लशीची दुसरी मात्रा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनंतर घेता येणार आहे. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेची मर्यादा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनी घेण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच आता निर्बंध शिथिल केल्यानंतर शासकीय आणि खासगी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत.
शासकीय आणि खासगी आस्थापानांमधील कर्मचारी कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेण्यास मुभा देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून सातत्याने करत होते. या मागणीची दखल घेत पालिकेने लसीकरणाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पर्यटनासह अन्य काही कारणांसाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या आणि खासगी, शासकीय आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्डला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्रावर कोव्हिशिल्ड लशीचा उल्लेख हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. दरम्यान, या सर्वात पालिकेने काही काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हंटले असून त्याविषयीच्या सूचना देखील जारी केल्या आहेत.
शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि त्यांना भेटण्यास येणाऱ्या अभ्यागतांना मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल के ला जाणार आहे. राज्य शासनाने तसा आदेश जारी केला आहे. कामकाजानिमित्त कार्यालयांमध्ये किंवा आवारात येणाऱ्या अभ्यागतांनाही नाक आणि तोंड पूर्णपणे झाकले जाईल, अशा पद्धतीने मुखपट्टीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.