भाडेतत्वावरील 1,512 घरे रहिवाशांच्या नावावर ः मनपा शहर सुधारणा समितीचा निर्णय
प्रत्येक घराची किंमत 12 ते 15 लाखांदरम्यान
पुणे – महापालिकेची मालकी असलेल्या इमारतीत भाडेतत्वावर काही सदनिका देण्यात आल्या आहेत. या सदनिका संबंधित भाडेकरू नागरिकांच्या नावावर करण्यात येणार आहेत. शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 1 हजार 512 सदनिकांची विक्री करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपयांदरम्यान ही सदनिका उपलब्ध होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील विविध भागांत रस्ता रुंदीकरण करताना अडथळा ठरणाऱ्या मिळकती पालिकेने ताब्यात घेतल्या. या मिळकतीमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंचे पुनर्वसन महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत करण्यात आलेले आहे. प्रति महिना 450 रुपये या दराने पालिका या मिळकतीचे भाडे आकारते. या मिळकती संबंधित भाडेकरूच्या नावावर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला होता.
रेडिरेकनर दरानुसार किंमत ठरणार
पालिकेच्या मुख्य खात्यासह औंध, कोथरूड, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत या सदनिका भाडेतत्वावर देण्यात आलेल्या आहेत. यातील 1 हजार 81 सदनिका मुख्य खाते, तर 431 सदनिका क्षेत्रीय कार्यालयांच्या आहेत. पालिकेने 1991-92 पासून अशा पद्धतीने भाडे तत्वावर सदनिका दिलेल्या आहेत. ज्या भागात या सदनिका आहेत, तेथील रेडिरेकनरचा दर लक्षात घेऊन याची विक्री केली जाणार आहे. 270 चौरस फूट आकारातील या सदनिका आहेत. शहर सुधारणा समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे भाडेकरू आता मालक होणार असून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
भाडेतत्वावर दिलेल्या सदनिकांची विक्री होणार असल्याने पालिकेला महसूल मिळणार आहे. या सदनिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी होणारा पालिकेचा खर्च वाचणार आहे. तसेच या विकलेल्या मिळकतीचा टॅक्स जमा होणार असल्याने उत्पन्नाचा स्रोत वाढणार आहे.
– आनंद रिठे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती