नवी दिल्ली – जागतिक शेअर बाजारांमध्ये सोमवारी बरेच नकारात्मक वातावरण होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोने खरेदी केल्यामुळे सोमवारी सोन्याच्या दरात माफक वाढ झाली. निर्देशांक अस्थिर राहिल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 14 रुपयांनी वाढून 45,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीच्या दरामध्ये 98 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 58,890 रुपये प्रति किलो झाला.
सकाळच्या सत्रामध्ये रुपयाच्या मूल्यात 34 पर्यंत पैशांची घट झाली होती. त्यामुळे आयात महागात पडते.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,753 डॉलार तर चांदीचा दर 22.47 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहिला. जागतिक शेअर बाजार निर्देशांक सोमवारी कमालीचे अस्थिर राहीले. आगामी काळामध्ये गुंतवणूकदारांचे शेअर बाजाराकडे लक्ष राहणार आहे. जर निर्देशांक घसरत गेले तर सोन्यातील गुंतवणूक वाढू शकते असे विश्लेषकांना वाटते.