सोलापूर – जालना येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर विठुरायाला तब्बल ५५ लाख रुपयांचे हिरेजडित सोन्याचे घोंगडे अर्पण केले आहे. संपूर्णपणे सोन्यामध्ये अतिशय बारीक कलाकुसर केलेले व त्याला माणिक आणि पांढरे हिरे बसवलेले हे सोन्याचे घोंगडे तब्बल ८२ तोळे वजनाचे आहे. सध्या द्यायचे थोडे आणि वाजवायचे जास्त अशी रीत सुरू असताना या भक्ताने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर एवढे मोठे दान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी देवाला सोन्याचा पोशाख करताना त्याच्या खांद्यावर घोंगडी, हातात सोन्याची काठी असा गुराखी रूपातील कृष्णाचा अवतार केला जातो. विठुरायाच्या खजिन्यात सोन्याची घोंगडी नसल्यामुळे आतापर्यंत लोकरीच्या घोंगडीचा वापर केला जात असे. पण आता या महिला भक्ताने दिलेल्या या हिरे जडित सोन्याच्या घोंगडीमुळे हा प्रश्न सुटला आहे.
विशेषतः या माध्यमातून देवाच्या खजिन्यात एका मौल्यवान दागिन्यांची भर पडली आहे. या महिला भक्ताच्या साधकांनी शुक्रवारी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे हे सोन्याचे घोंगडे आणून विठुरायाच्या चरणी अर्पन केले. जालना येथील दत्त मंदिरात या महिला संताचे मोठे काम असून त्यांचे हजारो अनुयायी असल्याचे समजते.
याच भक्ताकडून सोन्याचे धोतर
उल्लेखनीय बाब म्हणजे जालन्याच्या याच महिला भक्ताने दुसऱ्यांदा असे दान मिळाले आहे. या भक्ताने गतवर्षी मोहिनी एकादशीच्या दिवशी विठोबाच्या चरणी पावणे २ किलो वजनाचे सोन्याच्या धोतर, नाजूक बनावटीचा चंदन हार व सुंदर कलाकुसर असणारा कंठा मौल्यवान दागिने अर्पण केले होते. त्यानंतर याच महिला भाविकाने वसंत पंचमी दिवशी १ कोटी ८० लाख रुपयांचे दागिने देवाला आणि रुक्मिणी मातेला विवाहासाठी अर्पण केले होते.