गोकुळ दूध विक्रीचा नवा उच्चांक; 1 दिवसांत 15 लाख लिटर्सचे वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उत्पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनासह विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने बकरी ईदनिमित्त एका दिवसात 15 लाख 25 हजार लिटर्स इतकी दूध विक्री केली आहे. गोकुळने यावर्षी दूध विक्रीचा नविन उच्चांक गाठला असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, गोकुळने गेल्यावर्षी याच दिवशी म्हणजे ईदच्या दिवशी 12 लाख 62 हजार लिटर्स इतकी दूध विक्री केली होती. यावर्षी यामध्ये 2 लाख 63 हजार लिटर दुधाची विक्री वाढली आहे. या कौतुकास्पद कामगिरी बद्दल जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळ व्यवस्थानाचे कौतुक केले आहे. चांगले नियोजन आणि योग्य कारभार करत गोकुळने दूध विक्रीमध्ये नविन मानदंड प्रस्तापित केला आहे.

गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवला आहे. गोकुळने दिवसाला 20 लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले असून हे उद्दिष्ट गोकुळ दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर साध्य केला जाईल. 

या यशामध्ये गोकुळचे दूधउत्पादक, दुधसंस्था, ग्राहक, वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्यामुळे ते कौतुकास पात्र असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच चेअरमन विश्‍वास पाटील यांनी गोकुळ परिवाराच्या वतीने मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.