कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरासह विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस दूध दोन रुपये तर गाय दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे.
गोकुळचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या निर्णयामुळे जिह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. याचबरोबर पुणे आणि मुंबई येथील विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला विक्री दरवाढीतून वगळण्यात आले आहे. सोमवार 11 पासून नवे दर लागू होणार आहे.
सतेज पाटील म्हणाले, या दरवाढीमुळे गोकुळवर वर्षाला 71 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र मुंबई आणि पुण्यातील विक्रीतील दरवाढीमुळे 69 कोटी रुपये गोकुळच्या तिजोरीत जमा होणार आहेत.
तरीही दोन कोटीचा राहिलेला फरक भविष्यात भरून काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोकुळ निवडणुकीच्या काळात प्रचारा दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये जादा दर देऊ, असे आश्वासन दिले होते. याची पूर्तता करण्यासाठी गेली 40 ते 45 दिवस आढवा घेतला जात होता.
संचालक मंडळाच्या बैठका घेऊन मार्ग शोधणे सुरु होते. आढावा घेत असताना अनेक गंभीर तृटी समोर आल्या. अतिरिक्त कर्मचारी कमी केले. रोजंदारीवरील कर्मचारी भरती बंद केली. स्वच्छतेचा ठेका रद्द करुन गोकुळच्या आहे त्या कर्मचाऱ्यांकडून पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या.
वाहतुक खर्चात कपातीचा मोठा निर्णय घेतला. या माध्यमातून वर्षाला 10 ते 12 कोटी रुपये बचत होणार आहे. पशुखाद्याच्या बाबतीतही लवकरच धोरण ठरवण्यात येणार आहे. भविष्यात गोकुळ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती हेच ध्येय ठेऊन वाटचाल असणार आहे.