इस्लामपूर – मृत महिलेवर उपचार करून फसवणूक करणाऱ्या डॉ. योगेश वाठारकर याच्या आधार हेल्थ केअरमधील सीसीटीव्ही फुटेजच्या दोन हार्ड डिस्क ताब्यात घेतल्या असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांनी केलेला प्रकार गंभीर आहे.
गुन्ह्या बाबत माहिती देताना पोलिस उपाअधीक्षक पिंगळे म्हणाले,”आधार हेल्थकेअर मध्ये उपचारादरम्यान सायरा शेख यांचा मृत्यू झाल्याच्या तारखेबाबत त्यांच्या मुलाने तक्रार दिली होती.नगरपालिका दाखल्यावर मृत्यू ८ मार्च आणि प्रत्यक्ष मृतदेह १० मार्चला ताब्यात दिला होता. यामुळेच गोंधळ निर्माण झाल्याने संबंधित डॉ. योगेश वाठारकर याना पोलीस ठाण्यात बोलावून १० मे रोजी जबाब घेतला होता.
यावेळी डॉक्टरांनी रुग्ण १० मार्चलाच मृत झाल्याची माहिती दिली. दोन दिवसांत उपचराबाबतची सर्व कागदपत्रे सादर करतो असा लेखी जबाब दिला होता. त्यांनतर आज अखेरीस कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. दरम्यान नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाच्या लिपिक सुलोचना माळी व त्यांच्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. तेव्हा डॉक्टरांनी फॉर्म क्र.२ भरून देताना त्यात सायरा हमीद शेख यांचा मृत्यू ८ मार्चला झाल्याचे लिखित स्वरूपात दिल्याचा जबाब नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिला आहे. पोलीस तपासाची व जबाब सुरू असल्याची माहिती लागताच हॉस्पिटलच्या अज्ञात कर्मचाऱ्यांने पालिकेत येवून ८ मार्च तारीख खाडाखोड करून पुन्हा १० मार्च केली होती.”
ते म्हणाले ,” याचवेळी दवाखान्यातील घोषणापत्र फॉर्म नं ४ मध्ये डॉक्टरांनी मृत्यूची नोंद ८ मार्च अशीच ठेवली होती. हे पोलिसांच्या तपासात लक्षात आले. तसेच रुग्णालयातील २४ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता डॉक्टरांनी ते देण्यास असमर्थता दाखवली होती. फक्त १४ दिवस डेटा सेव्ह होतो.
आता आमच्याकडे उपलब्ध नाही असे कारण दिले. उपचारांची कोणतीही कागदपत्रे सादर न करणे, नगरपालिकेत ८ मार्चची नोंद आणि पुन्हा डॉक्टरांनी भरून दिलेल्या फॉर्म क्र.२ मध्ये पालिकेत जावून खाडाखोड करणे, सीसीटीव्ही फुटेज न देणे हे सर्वच संशयास्पद होते. यामुळे हे सर्व अहवाल व सर्वांचे जबाब याचा पाच पानी अहवाल पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना १७ मे रोजी सादर केला होता. याचा अहवाल ६ जुलैला उपलब्ध झाला. डॉ.वाठारकर दोषी असल्याच्या अहवालावरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यावेळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.
हॉस्पिटलच्या आवारात सन्नाटा ; अनेक रुग्ण झाले स्थलांतरित
बहुचर्चित आधार हेल्थकेअरच्या डॉ. योगेश वाठारकर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दिवसभरात हॉस्पिटलच्या आवारात सन्नाटा होता. हॉस्पिटलमध्ये कोविड असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात होते. उपचार करणारा डॉक्टरच गजाआड गेल्याने रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त होते. दुसऱ्या कोविड रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव झाली. मृत महिलेवर डॉक्टरांनी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आतां आपल्या रुग्णांचे काय ? अशी भीती तयार झाली होती. या भितीपोटी आज अनेक नातेवाईक हवालदिल दिसले.
कट प्रॅक्टिसचा देव माणूस..!
बहुचर्चित असणाऱ्या डॉ.योगेश वाठारकर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पोलीस उपविभागीय कार्यालयात वाळवा आणि शिराळा तालुक्यातील कट प्रॅक्टिस करणाऱ्या अनेक डॉक्टरांनी धाव घेतली. डॉ.वाठारकर हा ” देवमाणूस ” असल्याची मांडणी करत पाठराखण केली. पण शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यामुळे या गुन्ह्यात तथ्य असू शकते असे म्हणत “त्या” समर्थकांनी पोलीस ठाण्याचे आवार सोडत आपापले घर व दवाखाने जवळ केले.