क्रिकेटच्या विश्वजगात आजही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. क्रिकेटच्या इतिहासात सचिनचे नाव कायमच सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले असेल. 3 वर्षांपूर्वी सचिनच्या जीवनावरील “सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा बायोपिक प्रदर्शित झाला होता. या बायोपिकला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर सचिनच्या जीवनावर आणखी एक चित्रपट तयार होत असून तो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
“गॉड ऑफ क्रिकेट’ असे या चित्रपटाचे नाव असून यात सचिनच्या संपूर्ण आयुष्याची आणि क्रिकेट कारकिर्दीची प्रेरणादायी कथा दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे ज्यामध्ये व्हॉईस ओव्हरमध्ये महेश भट्टचा आवाज ऐकू येत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सचिनच्या वाढदिवशी एक मोशन पोस्टर प्रदर्शित करत 24 एप्रिल 2021 रोजी सचिनच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी घोषणा केली.
मोशन पोस्टरमध्ये कुरळे केस असलेला एक लहान मुलगा हातात बॅट घेवून दिसत आहे. या पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्ये मुलांचा एक डायलॉग आहे की, “देवाने सांगितले की खेळायचे. तर फक्त खेळायचेच.’ असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट सचिनचा चाहता असलेल्या एका मुलाची कथा आहे. या चित्रपटात संग्राम सिंह देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. दरमयान, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाविषयी जास्त माहिती दिलेली नाही.