पणजी: भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या वहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला यंदा 50 वर्षे पूर्ण होत असून यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 76 देशांतील 200 हून अधिक सर्वोत्कृष्ट चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील. तसेच चित्रपत क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ एका विशेष विभागात बच्चन यांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. याशिवाय ज्या चित्रपटांच्या प्रदर्शनाला 50 वर्षे झाली, असे विविध भाषांमधील 12 चित्रपट दाखवले जातील.
यावर्षी दृष्टीहिनांना चित्रपटांचा आनंद घेता यावा, यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरुन त्यांच्यासाठीही काही चित्रपट दाखवले जातील. तसेच इंडियन पॅनोरामा हा आयएफएफआयचा प्रमुख विभाग आहे, जो आधुनिक काळातील उत्तम वैशिष्ट्यपूर्ण आणि बऱ्याच वर्षांतील चित्रपट नसलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करतो. त्यामध्ये मराठीमधील सुजय डहाके यांचा “तुझ्या आयला’, समीर विद्वांस यांचा “आनंदी गोपाळ’, शिवाजी लोटन-पाटील यांचा “भोंगा’ आणि अनंत महादेवन यांचा “माई घाट-क्राईम नं.103/2005′, तसेच आदित्य राठी आणि गायत्री पाटील यांचा “फोटो-प्रेम’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.
मुख्य प्रवाहातील सिनेमांमध्ये आदित्य धर यांचा “उरी- द सर्जिकल स्ट्राईक’, झोया अख्तरचा “गल्ली बॉय’, विकस बेहल यांचा “सुपर 30′, अमित शर्मा यांचा “बधाई हो’ हे हिंदी तर अनिल रविपुडी यांचा “एफ-2′ हा तमिळ चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. अशा प्रकारे “इंडियन पॅनोरमा’ विभागात एकूण 26 चित्रपट दाखवले जातील.
अभिषेक शहा दिग्दर्शित “हेल्लारो’ या गुजराती चित्रपटाने या महोत्सवाचा शुभारंभ होईल. तर आशिष पांडे दिग्दर्शित “नूरे’ या काश्मीरी फिल्मने नॉन-फिचर फिल्म विभागाचा शुभारंभ होईल. विख्यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने चित्रपटांची तर दिग्गज लघुपट निर्माते राजेंद्र जांगले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने माहितीपटांची निवड केली आहे.