नवी दिल्ली – गोवा चॅलेंजर्सने पुणेरी पलटणचा 11-4 असा पराभव केला आणि अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. त्यांच्या या विजयात चेंग ईचांग व अँन्थोनी अमलराज यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.
या स्पर्धेत यु मुंबा, दबंग दिल्ली व चेन्नई लायन्स यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ईचांग व अमलराज यांनी प्रत्येकी एकेरीचा एक सामना जिंकला तसेच त्यांनी मिश्रदुहेरीतही विजय मिळविला.
एकेरीच्या पहिल्या सामन्यात ईचांगने अहिका मुखर्जीचा 11-8, 11-5 असा पराभव केला व गोवा संघास आघाडी मिळवून दिली. पुण्याच्या चुआंग चिहयुआन याने अल्व्हारो रोबेल्सवर 11-9, 11-5 असा विजय मिळवित लढतीत 1-1 अशी बरोबरी साधली. ईचांगने अमलराजच्या साथीत अहिका व चिहयुआन या जोडीला 11-7, 9-11, 11-7 असे पराभूत करीत पुन्हा गोव्यास आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत अमलराजने हरमित देसाईचा 11-7, 11-7 असा पराभव केला आणि संघाची आघाडी वाढविली. महिलांच्या एकेरीत गोव्याच्या अर्चना कामतने पुण्याच्या सॅबिनी विंटरला 8-11, 11-6, 11-9 असे हरवित संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.