पुणे – पुण्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा जल्लोश पाहायला मिळत आहे. अनुचित कोणताही प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरूजी तालीम मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवाची जय गणेश कसबा पेठ ७ थर लावून ९.४६ ला दही हंडी फोडून उत्सवाची सांगता केली. त्यानंतर लक्ष्मीरोड वरील गणपती चौकातील तरुणाई दही हंडीचा आनंद घेत होती.
आज सायंकाळपासून मंडळाचे कार्यकर्ते दहीहंडी महोत्सवाचा तयारीत होते.. याला रंगत आणली ते म्हणजे पुण्यातील ढोल ताशे पथकाने… यात एक दिलं, समर्थ, गजर, शिवताल प्रत्येक ढोल पथकांनी २० २० मिनीटे वादन करून आपला ताल आणि ठेका सादर करत तरुणाई मध्ये उत्साह भरला. यानंतर डीजे आणि मराठी हिंदी रिमिक्स गाणी.. रंगीबेरंगी लाईटवर लक्ष्मीरस्ता दंग हून गेला होता.
तरूणाईचे आकर्षण ठरले ते शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुरूजी तालीम मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी महोत्सव. दहीहंडीच्या ठिकाणी कलाकारांना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. ह्यात संगीतकार अजय अतुल, अभिनेते प्रविण तरडे, ईशान्य महेश्वरी, डीजे तपेश्वरी, डिजे अखिल तालरेजा यांनी हजेरी लावली. तर पुण्यातील रील स्टार देखील उपस्थित होते. अजय अतुल मोरया मोरया गाणं म्हणून दहीहंडी चा आनंद द्विगुणित केला.
काँग्रेसच्या आजी- माजी आमदारांची दहीहांडीच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी तर विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील अनेक कार्यकर्ते यांनी भेट देऊन दही हांडीचा आनंद लुटला. डी जेच्या दणदणाटांमध्ये उडत्या चालीच्या गाण्यांवर तरुणाई बेधुंद होऊन नृत्याचा आनंद लुटत असतानाच मधुनच येणारी पावसाची हलकीशी सर वातावरणातील उत्साह वाढवत होती. गोविंदा पथकांमध्ये उत्साह वाढवत होती.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त !
संपूर्ण पुणे शहरात दहीहंडीमुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे शहरात कालपासूनच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी, चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहे. मोठ्या दहीहंडीजवळ मोठ्या संख्येनं पोलीस उपस्थित आहे. रात्री 10 वाजेपर्यंतच यंदा दहीहंडीसाठी आणि जल्लोशाची परवानगी देण्यात आली आहे.