जिनिव्हा – जगभरात गेल्या आठवड्यात सुमारे 3 दशलक्ष नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मृत्यदरात 3 टक्क्यांनी वाढ झाली असून मृत्यदर 10 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे.
बुधवारी जारी केलेल्या साप्ताहिक अहवालात यूएनच्या आरोग्य एजन्सीने म्हटले आहे की सर्वाधिक नवीन रुग्ण ब्राझील, भारत, इंडोनेशिया आणि युनायटेड किंगडममध्ये आढळून आले आहेत. याशिवाय 111 देशांमध्ये सहजतेने पसरल्या जाणाऱ्या डेल्टा प्रकाराचा संसर्ग झाला आहे. हा संसर्ग वाढण्याचा धोका असून येत्या काही महिन्यांत त्याचा प्रसार जागतिक पातळीवर होण्याचा धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डब्ल्यूएचओ म्हणण्यानुसार, कोविड-19च्या अधिक संक्रमित आवृत्त्या उद्भवू शकतात. यामुळे जगभरातील सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपायांचा वापर गतिमान करणे आवश्यक आहे. करोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता करोनाबाधितांची संख्या वाढून मृत्यूचे प्रमाणदेखील वाढू शकते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, करोना संबंधित उर्वरित निर्बंध हटविण्यासाठी बऱ्याच देशांना दडपणाचा सामना करावा लागत आहे.