जेरुसलेम – इस्रायलचे इस्लामिक जगताशी आजवर मोठे वैमनस्य दिसून आले आहे. पण आता मात्र हे समीकरण बदलत चालल्याचे निदर्शक असल्याची एक घटना आज घडली. संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलमधील आपला स्वतंत्र दूतावास सुरू केला असून, त्याचे आज औपचारिक उद्घाटन झाले आहे.
या प्रसंगी बोलताना इस्रायलचे अध्यक्ष इस्साक हर्झोग यांनी म्हटले आहे की, भविष्यातील सुख, शांती आणि मध्य पूर्वेतील सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची ठरेल. दोन आठवड्यांपूर्वीच इस्रायलच्याही अबुधाबी येथील दूतावासाचे उद्घाटन झाले आहे. संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायल यांच्यातील संबंध सलोख्याचे होत चालले आहेत याचे हे निदर्शक मानले गेले आहे.
या दोन्ही देशांनी गेल्या वर्षी आपसांत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. अन्यथा या दोन्ही देशांमध्ये आजवर राजनैतिक संबंधही नव्हते. अमेरिकेने दोन देशांमध्ये हे मिलन घडवून आणले आहे. त्यासाठी गेल्या सप्टेंबर महिन्यात व्हाईटमध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये राजनैतिक संबंधांच्या एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. संयुक्त अरब अमिरातीने सुरू केलेले हे दूतावास इस्रायलच्या तेलअविव या शहरात आहे.