गुड न्यूज : देशातील कोरोना रिकव्हरी रेट वधारला; मृत्युदरात घट

नवी दिल्ली – देशातील कोरोनामुक्तांची संख्या आज 13,28,336 वर पोहचली असून यामुळे कोरोना रिकव्हरी रेट वधारला आहे. सध्या देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 67.62 टक्क्यांपर्यंत वाढले असून मृत्युदर 2.07 टक्के इतका कमी झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

सध्या देशातील सक्रिय बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,32,835 ने अधिक आहे. भारतात सध्या 5,95,501 सक्रिय बाधित असून सक्रिय बाधितांच्या टक्केवारीत मोठी घट पहायला मिळत आहे. देशात 24 जुलै रोजी 34.17 टक्के एवढी असलेली सक्रिय बाधितांची टक्केवारी आता 30.31 टक्क्यांपर्यंत घटल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

देशामध्ये केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी कोरोना चाचण्या, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध व उपचार ही त्रिसूत्री प्रभावीपणे वापरत पायाभूत आरोग्य सुविधा व चाचण्यांची क्षमता वाढवली. तसेच सर्व रुग्णांवर उपचार करताना केंद्राच्या प्रोटोकॉलचे पालन केले. या सर्वांमुळे देशातील कोरोना मृत्यूंची संख्या नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान, देशात आज 56,282 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून  904 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत 19,64,536 जणांना कोरोनाची बाधा झाली असून
40,699 कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.