संधी द्या, वकील संघाचे प्रश्‍न मार्गी लावतो : आशुतोष काळे

कोपरगाव – ज्यावेळी कोपरगाव तालुक्‍याच्या जनतेने माजी आमदार अशोकराव काळे यांना निवडून दिले. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम शासकीय इमारतींसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे सोयीचे झाले. वकिलांनाही अनेक अडचणी असून, त्या पूर्णपणे सुटल्या नाहीत.

मला संधी द्या, वकील संघाचे प्रश्न मार्गी लावतो, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुका वकील महासंघाचा नूतन पदाधिकारी निवड समारंभ कार्यक्रम श्री साईबाबा तपोभूमी मंदिरात पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एन. मंगले होते.

या कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोडकळीस आलेल्या न्यायालयाच्या इमारती, बारकौन्सिल इमारतीबाबत प्रस्ताव पाठवूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत वकील संघाच्या अडचणी मांडल्या. काळे म्हणाले, वकील संघाच्या अडचणी रास्त आहेत. 2004 पर्यंत कोपरगाव शहरात असलेल्या तहसील कार्यालय, न्यायालय इमारती, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय आदी शासकीय इमारतींच्या नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. त्याचबरोबर वकिलांच्या बारकौन्सिलचाही प्रश्न सुटलेला नव्हता. त्यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी शासकीय इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज कोपरगाव शहरात भव्य अशा शासकीय इमारती उभ्या राहिल्या आहेत. अजूनही वकील संघाच्या अडचणी बाकी आहेत. त्या आपण सोडवू, अशी ग्वाही त्यांनी वकील संघाच्या सदस्यांना दिली.

यावेळी त्यांनी वकील महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एन. मंगले, न्यायाधीश आर. डी. भागवत, वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस. एन. सचदेव वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शिरीष लोहकणे, उपाध्यक्ष ऍड जी. जी. गुरसळ, महिला उपाध्यक्ष ऍड. एस. एस. देशमुख, सचिव ऍड. एम. एस. खैरनार, सहसचिव ऍड. एस. एस. डेंगळे, खजिनदार ऍड. एस. पी. मगर, ऍड. व्ही. जी. सदाफळ, ऍड. यू. एन. पाइक, पी. एस. काजळे, ऍड. सतीश बोरुडे, ऍड. एन. पी. गिरमे, खजिनदार सागर मगर, तसेच वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)