सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण

कोपरगाव – कोपरगाव शहरात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी शहरातील धारणगाव रस्त्यालगत माला घोंगडी या महिलेवर चोरट्यांनी पिस्तूल रोखले होते. मात्र घोंगडी यांनी त्यांचा प्रतिकार करून त्यांना पळवून लावले.

या व अशा प्रकारच्या घटना कोपरगावात वारंवार होत आहेत. त्यामुळे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या धारणगाव शाखेद्वारे 20 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, त्यांचा लोकार्पण सोहळा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व ज्येष्ठ पत्रकार सुरेश रासकर यांचे हस्ते करण्यात आले. कोपरगाव शहर भयमुक्त करण्यासाठी 20 सीसीटीव्हींच्या माध्यमातून 100 टक्के भयमुक्त धारणगाव रस्ता करण्याचे काम महासंघाने केले आहे, असे उद्‌गार धारणगाव शाखेचे मार्गदर्शक उमेश धुमाळ यांनी काढले. व्यापारी नारायण अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी माला घोंगडी यांनी दाखविलेले शौर्य महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक जिवंत उदाहरण असून, त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते महिला शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, यासाठी खासदार, आमदार, नगराध्यक्ष यांनी प्रयत्न करावेत. कोपरगाव शहरातील सामाजिक संघटनांनीही यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कोयटे यांनी केले. धारणगाव रस्त्याचे सुशोभीकरण करून या रस्त्याला धारणगाव रोड ऐवजी छत्रपती संभाजी महाराज मार्ग, असे नाव द्यावे अशीही सूचना कोपरगाव परिसरातील व्यापारी चेतन खुबानी यांनी केली.

या सूचनेस उपस्थितांनी पाठिंबा दिला. महासंघाचे महासचिव सुधीर डागा यांनी धारणगाव रोड शाखेची कार्यकारिणी जाहीर केली. ती अशी ः शाखा अध्यक्ष- गुलशन होडे, कार्याध्यक्ष- रूपेश शिरोडे, उपाध्यक्ष- माला घोंगडी, सचिव- गणेश शिंदे, खजिनदार- दीपकशेठ विसपुते, मार्गदर्शक- अकबर शेख, उमेश धुमाळ, अरुण वाणी. सूत्रसंचालन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सहसचिव राम थोरे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.