5 डिसेंबरपासून देशव्यापी संप करणार ; खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, मावळ, भोर, मुळशीतील डाकसेवक सहभागी
मंचर – अखील भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने डाक सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गुरुवारी (दि. 10) पुणे शिवाजीनगर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यात आले, अशी माहिती ग्रामीण डाक सेवक
संघटनेचे जिल्हा सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिली.
ग्रामीण डाक सेवकांना आठ तासांचे काम देऊन खात्यात समाविष्ट करण्यात यावे, जीडीएस समितीने शिफारस केल्याप्रमाणे 12, 24, 36 सर्व वरिष्ठ जीडीएसना अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी, ग्रॅच्युटी दीड लाखाहून पाच लाख करण्यात यावी, इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे काम कमिशनवर नको तर कामाच्या वर्कलोडमध्ये धरण्यात यावे.
180 दिवसांची रजा मंजूर करण्यात यावी, मेडिकल सुविधा सुरू करण्यात यावी, ग्रामीण डाक सेवकांचे दर्पण डिव्हाईस मागे घेऊन त्यांना लॅपटॉप, प्रिंटर, ब्रॉडबॅंड नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, मावळ, भोर, मुळशी या तालुक्यांतील ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष वसंतराव चरेकर आणि सचिव तान्हाजी देवाडे यांनी दिली.
डाक सेवकांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 डिसेंबरपासून देशव्यापी बेमुदत संप करण्यात येणार आहे.
– एकनाथ मंडलिक, विभागीय सचिव