बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र तरीही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोघांनीही मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. सिद्धरामय्या यांनी तर मुख्यमंत्रीपदावर थेट दावा केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी,”मला आधी दोन वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्या. त्यानंतर डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या, असा प्रस्तावच काँग्रेस नेत्यांपुढे मांडला आहे.
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी पार्टीसमोर एक फॉर्म्युला ठेवला आहे. आधी दोन वर्ष मला मुख्यमंत्रीपद द्या. त्यानंतर तीन वर्ष डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. माझं वय झालं आहे. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पहिल्या टप्प्यात सरकार चालवावं अशी माझी इच्छा आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. मात्र, डीके शिवकुमार यांनी राजस्थान आणि छत्तीसगडची उदाहरणे देऊन हा फॉर्म्युला फेटाळून लावला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी आमदारांकडे पाठबळ मागितले आहे. जर डीकेंना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडल्यास सिसिद्धरामय्यांची समजूत कशी घालायची? त्यांना कोणती जबाबदारी द्यायची? असा प्रश्न काँग्रेस हायकमांडसमोर उभा आहे.
शिवाय गेल्या तीन वर्षांपासून डीकेंनी पक्षासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्या आहेत. पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवले नाही तर पक्षात चुकीचा मेसेज जाऊ शकतो. आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले तर सिद्धरामय्या नाराज होतील. त्यामुळे अडकित्यात सुपारी अडकावी तशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.