बाजार समितीच्या सभापतिपदी जांभळकरांना संधी द्या

पिंपळे जगताप येथे वळसे-पाटलांकडे साकडे : 39 गावांतील संचालकाला संधी मिळणार असल्याची चर्चा

केंदूर – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी संचालक शंकर जांभळकर यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या स्थानिक युवकांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. शिरूर-हवेली मतदारसंघातील पिंपळे जगतापच्या ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात पत्राद्वारे वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. मे 2017 मध्ये झालेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनलमधून शंकर जांभळकर यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मतदान राष्ट्रवादीला मिळाले.

यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पत्नी दिव्या जांभळकर यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यावेळी पाबळच्या सविता बगाटे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी जांभळकर यांनी बगाटे यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही डॉ. अमोल कोल्हे यांना जिल्हा परिषद गटातून 5 हजार मतांची आघाडी दिली. करंदी ग्रामस्थांसह गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जांभळकर यांना सभापतीपदी संधी द्यावी, यासाठी साकडे घातले.

दोन दिवसांपूर्वी पिंपळे जगताप येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी स्वरूपात बाजार समितीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. समितीचे युवा संचालक शंकर जांभळकर यांना सभापतीपद द्या, अशा मागणीचे पत्र वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. सभापती शशिकांत दासगुडे यांच्यानंतर जांभळकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. शिरूरच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट 39 गावांतून शंकर जांभळकर यांचे नाव पुढे येत आहे.

दरम्यान, शिरूर बाजार समितीवर सभापती शशिकांत दासगुडे हे माजी आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघातील आहेत. आता यावेळी आंबेगावला जोडलेल्या 39 गावांतील संचालकाला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. जांभळकर हे उच्चशिक्षित युवा संचालक आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते, संपूर्ण संचालक मंडळाशी असलेले चांगले संबंध हे त्यांची जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशोक पवार यांच्या मर्जीतील दासगुडे हे जांभळकर यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा देणार का, याकडे शिरूर तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)