प्रभात वृत्तसेवा पुणे : शहरात रविवारी झालेल्या मुसळाधार पावसाने हडपसर येथील भाजी मंडईसह हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे, या सर्व व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी तातडीनं बैठक घेण्याची मागणी शिवसेना शिंदेगटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. शिंदेगटाचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यावेळी उपस्थित होते.
याबाबत बोलताना भानगिरे म्हणाले की, हडपसर भागात नुकताच मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे, या भागातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड खड्डे असून वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे, तातडीनं याबाबत बैठक घेण्यात यावी. त्यातच, पावसामुळे हडपसर येतील भाजी मंडई मध्ये पाणी घुसून भाजी विक्रेते , व्यवसाईक , दुकानदार यांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत मिळवी. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत तत्काळ बैठक घेण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच हडपसर भागातील प्रलंबित कामांसाठी 5 कोटींचा निधी मिळावा, काडेपडळ भागात पावसाळी वाहिन्यांसाठी निधी द्यावा अशा वेगवेगळया मागण्या करण्यात आल्या असून त्यांनी त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.