मुंबई – मराठा समाजाला आरक्षण द्या, त्यावर आमचा आक्षेप नाही, तर त्याला आमचा पाठिंबा आहे. पण त्याचवेळी मुस्लीम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण द्यावे, असे मुंबई उच्च न्यायालयानेही म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे आणि मुस्लिम समाजालाही शिक्षणात 5 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी एमआयएमचे प्रवक्ते आणि मुंबईतील माजी आमदार वारिस पठाण यांनी केली आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन वातावरण तापलेले असताना मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तणावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआयएम पक्षाच्या वतीने तशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली आहे. या संदर्भातला एक व्हिडीओ देखील एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वारिस पठाण यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या वेळी देखील एमआयएमच्या वतीने मुस्लिम आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. एमआयएमचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत झाले होते.
या अधिवेशनातच एमआयएमने मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. त्यावरुन कॉंग्रेसच्या वतीने एमआयएमवर टीका करण्यात आली होती. एमआयएम भाजपची “बी’ टीम असल्यानेच आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम आरक्षणाची मागणी करण्यात येत असल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते.