पुणे – गीता धर्म मंडळ पुणे या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त रविवारी गीतापाठ महायज्ञ आयोजित केला होता. याची नोंद ‘ आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. या महायज्ञामध्ये संपूर्ण जगभरातून दहा हजार आठशे साधक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या सर्व साधकांनी संपूर्ण श्रीमद् भगवद्गीतेचे १८ अध्याय सलग गायले. या साधकांमध्ये अडीच हजार साधकांचे गीता अध्याय कंठस्थ होते.
आज या मैदानावर भक्ती सागर उसळून आला आहे, अशी भावना गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांनी सर्व साधकांचे स्वागत करताना व्यक्त केली. मंडळाचा हा पहिलाच प्रयत्न असून, तो सर्व साधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण यशस्वी झाला आहे, असे दातार यांनी नमूद केले.
एका ठिकाणी एका वेळेला दहा हजारपेक्षा जास्त साधकांनी गीता पठण करणे हा एक विक्रम असून, आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे, असे आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या डॉक्टर चित्रा जैन यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहेंदळे, सहकार्यवाह प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, शताब्दी महोत्सव संयोजक ह. भ. प. मोरेश्वर बुवा जोशी आणि इतर सर्व पदाधिकारी यांना आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त संदीपसिंह गिल, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, हेमंत रासने, प्रदीप गारटकर, अभय माटे आदी उपस्थित होते. कार्यवाह विनया मेहेंदळे यांनी सर्वांचे आभार मानले.