जळगाव – राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार असून मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून तिन्ही गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा अनेकदा करण्यात आली. यातच आता शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गिरीश महाजनांबाबत (Girish Mahajan) एक विधान केले आहे.
‘मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार आहे. पण त्यांना नेहमी मोठी खाती मिळतात’, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावातील मातोश्री वृद्धाश्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात विनोदी शैलीत त्यांनी हे विधान केले.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “मी गिरीशभाऊंपेक्षा फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील मला काही घेणं देणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती भेटतात, पण भाऊ मी ज्या मतदारसंघात राहतो. त्या मतदार संघात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आहे, या ठिकाणी जैन उद्योग समुहाच्या दोन कंपन्या आहेत, आणि केशव स्मृती प्रतिष्ठान सुद्धा याच मतदार संघात आहे, त्यामुळेच मी स्वतःला खूप मोठा आमदार समजतो.”
दरम्यान, शिंदे गटामधील गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा खातं मिळाले आहे. तर गुलाबरावांच्याच जळगाव जिल्ह्यातील दुसरे मंत्री गिरीश महाजन हे ग्रामविकासमंत्री आहेत. दोन्ही मंत्र्यांमध्ये समन्वय चांगला आहे. मात्र असे असले तरीही हे दोन्ही नेते एकमेकांवर विनोदी शैलीत एकमेकांवर टीका करताना दिसतात. आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमात गुलाबरावांनी गिरीश महाजन यांच्यावर फटाकेबाजी केली आहे. गुलाबराव यांच्या या विधानानंतर उपस्थितींमध्ये देखील एकच हशा पिकली होती.