निमसाखर -घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेलगतच्या क्रीडांगण परिसरात विद्युत रोहित्राच्या लहान, मोठ्या तारा उघड्या पडल्याने नागरिक आणि महावितरण कर्मचाऱ्यांची जीव टांगणीला लागला आहे. डिपीजवळील कामे जीव मुठीत घेऊन करावी लागत आहेत. ही कामे जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घोरपडवाडी हे अठ्ठराशे लोकसंख्येचे गाव आहे. येथे 1 ली ते 4 थीपर्यंत 45 विद्यार्थी संख्या असलेली प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या क्रिडांगणाच्या एका बाजूला गावाला विद्युत पुरवठा करणारा डिपी आहे. संरक्षण तारेची जाळी बसवली आहे. सध्या डीपीलगत गवत, काटेरी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे डिपी धोकादायक अवस्थेत आहे. फ्यूज फुटलेले आहेत. जळालेल्या व कोटींग फुटलेल्या वायरमुळे हा डिपी सर्वांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली नाही.
यासंदर्भात नागरिकांनी राज्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन भरणे यांना दिल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, अद्यापही हे काम झाले नसल्यामुळे राज्यमंत्र्यांच्या सूचनेला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याची घोरपडवाडी परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
काही ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण केल्यानंतरच डिपी, आवश्यक केबलसह अन्य केबल्स मिळतात. मात्र, गावासाठीच्या डिपीला साहित्य का मिळत नाही, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऊर्जामंत्री यांना देणार आहे.
– रोहन पिसे, सरचिटणीस इंदापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी सेना