रुग्णालयात बेडची कमतरता, नागरिक भयभीत
देहूरोड – मंगळवारी सकाळी अकराची वेळ…. करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला इसम… परंतु रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने घरी राहण्याच्या डॉक्टरांकडून सूचना… पण तो गल्लीत धिंगाणा घालत होता….नागरिक भयभीत…पोलीस नियंत्रण कक्षात खणखणत होते दूरध्वनी…पोलिसांची, डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची पळापळ…दुपारी पोहोचला देहूरोड पोलीस ठाण्यात…अखेर त्याला पोहोचवला रुग्णालयात… देहूरोडकरांचा जीव पडला भांड्यात.
आंबेडकरनगर येथील एका महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली. त्यात तिच्या पतीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने त्याला घरात राहण्यास सांगितले. पण त्याने घराबाहेर येत परिसरात धिंगाणा घातला. त्यामुळे नागरिकांत भय वाढले होते. अनेक नागरिकांनी पोलिसांना, कॅन्टोन्मेंट रुग्णालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवर संपर्क साधला.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे आणि त्यांचे कर्मचारी पोहोचले. त्यांनी त्याची समजूत काढून रुग्णवाहिकेतून तळेगाव येथील रुग्णालयात आणले. त्यानंतर कुठे परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांकडून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.
बाधिताची पत्नी करोना पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्या कुटुंबाची तपासणी केल्यानंतर मंगळवारी सकाळी त्याचा अहवाल प्राप्त झाला. रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने त्याला घरी राहण्याची सूचना केली होती. परंतु स्थानिक नागरिकांनी त्याला त्रास दिला असेल म्हणून त्याने असे वर्तन केले असावे. तसेच तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. तो सूचनांचे पालन करत नव्हता. पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात आणले.
– डॉ. सुनीता जोशी, वैद्यकीय अधिकारी