प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दूरशिक्षण (डिस्टन्स लर्निंग), ऑनलाइन पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून, हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थीही नियमित अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समकक्ष राहणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता घरबसल्या पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेता येणार आहे.
करोनाच्या संसर्गाच्या काळात दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यासाठी “यूजीसी’ने बहुसंख्य अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने “स्वयम’पोर्टलवर उपलब्ध करून दिले. या ऑनलाइन व्यासपीठचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला. त्याच पद्धतीने मुक्त व दूरशिक्षणाचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्याच उद्देशाने “यूजीसी’ने दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचाच भाग म्हणजे आता दूरशिक्षणातून आणि ऑनलाइनद्वारे शिक्षण घेतलेल्या अभ्यासक्रमांना नियमित पदवीप्रमाणे मान्यता देण्याचा निर्णय “यूजीसी’ने घेतला आहे. त्याचे परिपत्रक “यूजीसी’चे सचिव प्रा. रजशीन जैन यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
“यूजीसी’च्या मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम आणि ऑनलाइन अभ्यासक्रम नियमावली 2022 च्या नियम 22 नुसार हा निर्णय घेण्यात आला. यापुढे “यूजीसी’शी संलग्न उच्च शिक्षण संस्थांद्वारे दूरशिक्षण आणि ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरावरील पदवी, पदविकांना पारंपरिक पदव्यांना समकक्ष असतील, असे स्पष्ट करण्यात आले. फक्त पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी हा निर्णय आहे; परंतु एमफिल आणि पीएचडी अभ्यासक्रम या माध्यमातून करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यूजीसीने नव्या नियमावलीनुसार दूरशिक्षण आणि ऑनलाइन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता दिल्याने अनेकांना शिक्षण घेण्याचा पर्याय अधिकृतपणे निर्माण झाला आहे. आता नियमित आणि दूरशिक्षण हे समान मानले जाणार आहे.
-डॉ. संजीव सोनवणे प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
दूरशिक्षण व ऑनलाइनमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये संधी मिळण्यास अडचणी होत्या. आता मात्र “यूजीसी’ने दूरशिक्षणाला अधिकृत मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळेल. या विद्यार्थ्यांकडे पाहण्याची मानसिकता बदलेल.
-डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती, सिंबायोसिस स्किल ऍण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी