मोफत जीएसटी सॉफ्टवेअर मिळणार

नवी दिल्ली: दीड कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या आणि मध्यम उद्योगांना अकाउंटिंग आणि बिलिंगसाठी मोफत सॉफ्टवेअर पुरविण्याचा निर्णय जीएसटी नेटवर्क म्हणजे जीएसटी एन कंपनीने घेतला आहे.
देशात दीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या उद्योगांची संख्या 80 लाख इतकी आहे. जीएसटीएनच्या या उपक्रमामुळे देशातील छोट्या उद्योगांना कार्यक्षमता सुधारण्यास तसेच डिजिटायझेशन साठी मोठी मदत मिळणार आहे.

या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या सॉफ्टवेअरमुळे छोट्या कंपन्यांना इन्व्हॉईस तयार करणे, अकाउंट स्टेटमेंट तयार करणे, गोडाऊनमधील हिशेब ठेवणे त्याचबरोबर जीएसटी विवरण तयार करण्यासाठी फायदा होणार आहे.
जीएसटी पोर्टल वरील डाउनलोड टॅबमध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. जीएसटी कंपनीने यासाठी 8 अकाउंटिंग सॉफ्टवेअर कंपन्यांबरोबर सहकार्य केलेले आहे. देशात छोट्या उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगातून कमी भांडवलात मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते. या कंपन्यांचा जीएसटीची कामे करण्यासाठीचा वेळ वाचावा, त्याचबरोबर त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये, याकरिता हा पुढाकार घेण्यात आलेला आहे.

या सॉफ्टवेअरमुळे उपलब्ध मालाचा हिशेब ठेवता येतो. पुरवठादार व ग्राहकाची माहिती व्यवस्थित ठेवता येणार आहे. इतरही काही मूल्यवर्धित सेवा या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याकरिता छोट्या कंपन्यांना काही प्रमाणात शुल्क द्यावे लागेल. जीएसटीएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी सांगितले की, जीएसटी परिषदेने छोट्या उद्योगांना अशा प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध करण्याची गरज असल्याचे जानेवारी महिन्यात सांगितले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×