वाघोली (प्रतिनिधी) : प्रसिद्ध लावणी डान्सर, बहुचर्चित गौतमी पाटील हिचा वाघोलीत कार्यक्रम होणार असल्याची चर्चा होती. मात्र वाघोलीतील कार्यक्रमास परवानगी नाकारली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग जयंत पाटील यांनी दिली. खाजगी कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील येणार असल्याने तिला पाहण्यासाठी तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.
वाघोलीत गौतमी पाटील येणार याची बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र परवानगी नाकारल्याची माहिती कळतात वाघोलीकरांत निराशा निर्माण झाली. आपल्या लावणीने तरुणाईला भुरळ घालणारी आणि नेहमी चर्चेत राहणारी ‘सबसे कातील गौतमी पाटील’च्या लावणीचा जलवा वाघोलीमध्ये मध्ये दिसणार होता.
मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची चर्चा वाघोली येथे मोठ्या प्रमाणात झाली आहे. माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी १९ जून रोजी वाघोली येथील बाजार मैदानात गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या परवानगीचा अर्ज पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केला होता. सद्यस्थिती परिमंडळ-४ हद्दीत जी-२० चा महत्वाचा व मोठा बंदोबस्त चालू आहे.
त्याचबरोबर पंढरपूर आषाढी वारीकरीता परिमंडळ कार्यालयामधून तसेच वाहतुक शाखेकडून जादा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे ठिकाणी बंदोबस्त पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाघोली बाजारतळ मैदान येथे गौतमी पाटील सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी देणेबाबतची विनंती अपर पोलीस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया यांनी अमान्य केली.
त्यानंतर ही हा कार्यक्रम चोखी ढाणी रस्त्या लगत होणार असल्याची चर्चा होती. मात्र हा कार्यक्रम परवानगी नसल्याने होणार नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांनी सांगितले. या बाबतीत सोशल मीडियावर गौतमी पाटील यांनी काही कारणास्तव कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल असे सांगितले आहे.