पुणे: आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर गॅसवाढविरोधात आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई , इंधनवाढ, गॅसवाढ आणि यामुळे हतबल झालेला सर्वसामान्य नागरिकांनी व्यथा कोठे मांडायच्या. आजपर्यंत कर्जबाजारीमुळे आत्महत्या होत होत्या पण इथुन पुढे “महागाईचे बळी” पडतील इतके भितीदायक वातावरण सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. भाजप सरकार,गॅसदरवाढ कमी करा ! कमी करा!!, अशी मागणी आंदोलनात सहभागी महिलांनी केली.
महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य होरपळून निघत असताना त्यात आता गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. एका सिलेंडरमागे सुमारे १४५ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आज विविध जिल्ह्यांमध्ये या दरवाढी विरोधात आंदोलने करण्यात आली. शिरूर, अहमदनगर आणि नाशिक येथे मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या व मोदी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला.