क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे पोल खोलणार; राजकीय नेत्यांसह अनेक खेळाडूंचे धाबे दणाणले
नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए सहभागी असणाऱ्या क्रिकेटमधील सर्वात मोठ्या मॅच फिक्सिंगमधील बुकी संजीव चावला याला इंग्लंड सरकारने गुरूवारी भारताच्या ताब्यात दिले.अशा स्वरूपाचे दोन्ही देशातील पहिलेच हस्तांतरण आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे आणि क्रिकेट खेळाडूंचे धाबे दणाणले आहे.
लंडनहून या इंग्लंडच्या नागरिकासह दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक गुरूवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्याची आर के पुरम येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी करण्यात येईल. फेब्रुवारी मार्च 2000 मध्ये द. अफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा झाला. हा दौरा फिक्स करण्यात चावलाने महत्वाची कामगिरी बजावली होती.
दिल्लीत जन्मलेला चावला हा व्यावसायिक व्हिसावर 1996मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक झाला होता. मात्र तो भारतात नियमितपणे येत असे. त्याचे भारतीय पारपत्र 2000 मध्ये जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याने पाच वर्षांनी ब्रिटीश पारपत्र घेतले. भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या गुन्हेगार हस्तांतरण करारानुसार झालेले हे पहिलेच महत्वाचे हस्तांतरण आहे.
युरोपीअन मानवी हक्क न्यायालयापर्यंत चावलाने हस्तांतरण विरोधात अपील केले होते. गेल्या महिन्यात इंग्लंडचे गृहमंत्री साजीद जावेद यांनी हस्तांतरणाला मान्यता दिली होती. त्याला 2016 मध्ये अटक झाल्यानंतर तो मानवी हक्काच्या मुद्यावर न्यायलयात हस्तांतरणाविरोधात दाद मागत होता.
अगदी अलीकडे जानेवारी 16ला भारताने त्याच्या साठी खास बनवलेल्या सुरक्षीत बराकीत त्याला ठेवण्यात येईल, असे दिलेले आश्वासन दोन सदस्यीय न्यायालयाने मान्य केले होते. भारताने त्याला वैद्यकीय सुविधा आणि कारागृहातील हिंसाचारापसून दूर ठेवण्यास मान्यता दिली होती. त्याचा मुक्काम तिहार कारागृहात असेल.