रावेत, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 16 रावेत-किवळे येथील विकासनगर भागामध्ये ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून दररोज कचरा साफ न केल्याने विकासनगरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील कचरा दररोज उचलावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विकासनगरमध्ये ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साठले आहेत. आरोग्य विभागाची घंटागाडी दररोज येत नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. रावेत परिसरात रस्ते साफसफाई करण्यासाठी व कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या दोन एजन्सी येथे काम करत आहेत. परंतु दोन्ही एजन्सी दररोज कचरा व रस्ता साफ करत नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. अनेकदा नागरिक वर्गणी करून रस्ते सफाई व कचरा उचलत आहेत.
त्यामुळे महापालिका नागरिकांकडून रस्ते साफसफाई, कचरा विलगीकरण व उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर घेऊन देखील अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे विकासनगर भागातील स्वच्छतेचे काम करणारे आरोग्य विभागाचे काम करत नाहीत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी येथील परिसराची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.