पुणे हादरले…हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पीडित मुलगी सासवड येथे सापडली

पुणे- घरातून रूसून बाहेर पडलेल्या किशोरवयीन युवतीला घरी परत सोडण्याच्या बहाण्याने सासवडमध्ये नेऊन सामुहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत दोन नराधमांना तातडीने अटक केली. अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

 

यात हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात “पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघा आरोपींच्या गुरूवारी रात्रीच मुसक्या आवळण्यात आल्या. त्याचे दोन मित्र मात्र फरार झाले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “या पंधरा वर्षीच्या मुलीचे मंगळवारी अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दिली होती. तिला कोणीतरी फुस लावून नेल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करुन तिचा शोध घेतला जात होता. दरम्यान, पोलिसांना ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चौघांनी बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले. या मुलीला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर ठाण्याच्या पोलीस पथकांनी शोध घेत गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपींना ताब्यात घेतले.’

 

“संबंधित मुलीचे तिच्या पालकांबरोबर वाद झाले होते. यामुळे ती रुसून रस्त्यावर भटकत होती. यातील एक आरोपी तिला यावेळी भेटला. त्याने “मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून मी तुला त्यांच्याकडे सोडतो,’ असे सांगितले. यानंतर तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याने त्याच्या दुसऱ्या मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अन्य दोघा मित्रांनी येऊन तिच्यावर बलात्कार केला.’

 

संबंधित कुटूंब तीन महिन्यांपूर्वीच पुण्यात रहावयास आले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रकरण संवेदनशील आहे. यातील दोघा संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दोघा आरोपींचा शोध सुरु आहे.

– नम्रता पाटील  पोलीस उपायुक्त परिमंडळ- 5

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.